Breaking news

पवना बंदिस्त जलवाहिनी: आंदोलन करायची गरज काय ? आजी-माजी आमदार व खासदार काय करतात? किरण गायकवाड यांचा थेट प्रश्न

लोणावळा : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी वरील स्थगिती दोन दिवसांपूर्वी शिंदे, फडणवीस व अजित दादा यांच्या सरकारने उठवल्याने मावळ तालुक्यामध्ये मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील बारा वर्षांपूर्वी या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मावळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे जनआंदोलन झाले. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळी हल्ल्यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती मागील बारा वर्षे कायम असताना आता मात्र सत्तेमध्ये आलेल्या शिंदे, फडणवीस व अजित दादा यांच्या सरकारने ही स्थगिती उठवत मावळातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. असे असताना आता मात्र सत्तेचा उपभोग घेणारे राजकीय पक्षातील मावळ तालुक्यातील नेतेमंडळी या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची भाषा करत आहेत. मात्र आंदोलन का आणि कशासाठी करायचे असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण गायकवाड म्हणाले, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जवळचे आहेत, माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत तर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे निकटवर्ती आहेत. असे असताना देखील मावळातील जनतेला आंदोलन करण्याची वेळ का येते ?  मागील बारा वर्ष स्थगित असलेला प्रश्न हे मावळातील तिन्ही नेते निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या जवळचे असताना देखील पुन्हा का चिघळतोय. याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. 

     पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प काय आहे व त्याला मावळ तालुक्यातील शेतकरी व नागरिक यांचा किती विरोध आहे हे मावळ तालुक्यातील नेतेमंडळी व महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेतेमंडळी यांना खडानखडा माहित आहे. असे असताना देखील मावळ वासियांवर अन्याय केला जात आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्या ऐवजी मावळचे आजी, माजी आमदार व खासदार या तिघांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा असे आवाहन किरण गायकवाड यांनी केले आहे.

सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार नाही - ठाकरे गट

पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन मावळ तालुक्यात होणार आहे. या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सहभागी होणार नसल्याचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी स्पष्ट केले आहे. ठोंबरे म्हणाले ज्या नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे तेच नेते व त्यांचेच पक्ष महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याच नेतेमंडळींनी पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवली आहे आणि आता तीच मंडळी आंदोलन करत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून विरोध आहे व तो कायम राहणार आहे. मात्र नागरिकांची बोळवण करत स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या संधी साधू पक्षांसोबत आम्ही आंदोलनात सहभागी होणार नाही‌ आम्ही बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या सोबत कायम राहू.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध - शशिकांत बेल्हेकर

मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा पहिल्या दिवसापासून विरोध असून आज देखील आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्र शासनाने या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील उठवलेली स्थगिती ही दुर्दैवी आहे. शासनाने आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख शशिकांत बेल्हेकर यांनी मावळ तहसीलदारांना दिले आहे.

इतर बातम्या