"दिशा" संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे : डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ हेल्प अँड आवेकनिंग (दिशा) संस्थेचा रौप्य महोत्सव हॉटेल इशा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा गौरव करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार, उपाध्यक्ष यशवंत लिमये, खजिनदार इंदू गुप्ता, विश्वस्त नितीन देसाई, ब्रिगे. अनुराग गर्ग आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी संस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य आणि पथनाट्य सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार आणि विश्वस्त नितीन देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, त्यांच्या कौशल्यविकासासाठी संस्थेच्या वतीने पुढील उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. मिताली शिल्लक यांनी अतिशय प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. शेवटी प्रदीप गुप्ता यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.