Breaking news

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल; सामाजिक सलोखा व शांतता राखण्याचे लोणावळा शहर पोलिसांचे सर्व धर्मीयांना आवाहन

लोणावळा – सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या युवकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याने पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

        शुक्रवारी या व्हिडिओविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज शिवसेना शहर युवा सेना शाखेनेही पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

शहरातील शांतता भंग करण्याचा कट?

सदरील व्हिडिओ नागपूरमध्ये झालेल्या घटनेशी साधर्म्य असलेला असून, लोणावळ्यातही अशाच प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक नागरिक आणि संघटनांचे म्हणणे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

पोलीस प्रशासनाचा इशारा – शांतता भंग करणाऱ्यांना सडेतोड कारवाईला सामोरे जावे लागेल!

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल केला असून, यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सर्व समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले असून, सोमवारी या प्रकरणावर शांतता समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक सलोखा जपण्यासाठी नागरिकांनी काय करावे?

  • धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.
  • कोणतीही शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधा.
  • शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या.
  • सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा.


इतर बातम्या