अनं...लोणावळ्यात महामार्गावरील अस्ताव्यस्त ब्लाॅकची झाली दुरुस्ती

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात वाहतूक नियमनासाठी रस्त्याच्या मध्यभागी लावलेले सिमेंटचे ब्लाॅक एलआयसी बिल्डिंग समोर मागील काही दिवसांपासून अस्ताव्यस्त झाल्याने अपघातांचा धोका वाढला होता. रात्रीच्या वेळी पावसात हे ब्लाॅक दिसत नसल्याने काही अपघात देखील झाले आहेत. याबाबत मावळ माझाने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करत वास्तव मांडले होते.
नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर यांनी याबाबत आयआरबी कंपनीला निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. महामार्गावर वाहतूककोंडी झाल्यानंतर काही वाहने विरुद्ध दिशेने पुढे जात वाहतूककोंडीत भर घालतात. याकरिता व वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशाने सदर ब्लाॅक बसविण्यात आले होते. मात्र त्यांच्या दर्शनीभागाला रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसेल असे बोर्ड अथवा रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या अंधारात या ब्लाॅकवरून वाहने जातात. यामुळे सदर ब्लाॅक अस्ताव्यस्त झाले होते. याठिकाणी लावण्यात आलेले ड्रम देखील पडले आहेत. सदरचे ब्लाॅक आयआरबी कंपनीने सुयोग्य स्थितीत लावावेत अन्यथा, प्लास्टिक फायबरचे खांब याठिकाणी लावण्यात यावेत, त्यांना रेडीयम करावे अशी मागणी कविश्वर यांनी केली होती. याची दखल घेत आयआरबी कंपनीकडून सदर दुरुस्ती करण्यात आली आहे.
मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा