Breaking news

Samperc News : संपर्कच्या मुलींसाठी खास मेंहदी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न; सुदीक्षा फाऊंडेशनचा उपक्रम

लोणावळा : संपर्कच्या मुलींसाठी खास मेंहदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सुदीक्षा फाऊंडेशन, कोथरुड पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. शनिवारी (20 मे) दिवसभर मुलींना हे प्रशिक्षण देण्यात आले. 

    भाजे, मळवली येथील संपर्क बालग्राम या अनाथ आश्रमात अनेक मुली आहेत. या मुलींना मेंहदीचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभ्या करण्याचा प्रयत्न सुदीक्षा फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. सध्या कोणताही कार्यक्रम असला तरी आकर्षक मेंहदी हातावर व पायावर काढण्याची फॅशन वाढली आहे. यामधून उत्तम प्रकारचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मुली भविष्यात यामधून स्वतःचा व्यावसाय देखील सुरु करु शकतात. या भावनेतून सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

    अँड. गजानन बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा व मार्गदर्शन सत्र पार पडले. अनिता एंटरप्रायझेसच्या प्रोप्रायटर अनिता अगरवाल या सदर शिबिराच्या प्रायोजिका होत्या. मेहंदी प्रशिक्षण व मार्गदर्शन ईशरत मुन्शी (ईशा) यांनी दिले. या प्रसंगी बोलताना सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी मुलींना आपल्यातील कलागुण ओळखून त्याचा विकास करुन आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असे विचार मांडले. तर अँड. बनकर यांनी मुलींना बालग्राम येथून चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन भारताचे चांगले नागरिक व्हा असे आवाहन केले. खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षका ईशरत मुन्शी यांनी प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले. यावेळी त्यांनी त्यांचा वाढदिवसही सर्वांबरोबर केक कापून साजरा केला. प्रशिक्षणार्थिंनी वर्गात मनापासून भाग घेतला आणि परत कधी येणार असेही विचारले. 

       समारोप प्रसंगी सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी मेहंदीचा सराव करा. आपण सेलिब्रिटींना हातावर मेहंदी काढायला बोलवून कार्यक्रम आयोजित करू असे प्रशिक्षणार्थी मुलींना सांगितले. संपर्क बालग्रामधील मुलांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे आभार मानले.

इतर बातम्या