Breaking news

Maval Good News : आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत पाटण मळवली येथील भाजीवालीचा मुलगा झाला वन परिक्षेत्र अधिकारी

कार्ला (प्रतिनिधी) : आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत एका भाजी वालीचा मुलगा आज वनपरिक्षेत्र अधिकारी झाला आहे. जिद्द व चिकाटी असेल तर परिस्थिती किती बिकट असली तरी यश हे मिळतेच. पाटण मळवली येथे राहणारा विशाल हरिहर याने संघर्षमय जीवन जगत हे यश संपादित केले आहे विशाल याची आई ही गावोगावी जाऊन भाजीपाला विक्री करते तर विशाल याचे वडील हे ट्रक चालक आहेत आई वडील यांनी काबाडकष्ट करत विशालला शिकवले त्याने देखील आई-वडिलांच्या कष्टाची आब राखत उत्तम शिक्षण घेत सात वर्षाच्या प्रयत्नानंतर आज हे मोठे यश मिळवले आहे त्याच्या या यशाचे पाटण मळवली पंचक्रोशी सह मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे.

     विशाल याचे इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण मळवली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण भाजे गावातील शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण हे लोणावळा येथील व्हि.पी.एस येथे झाले. घरची परिस्थिती हालखीची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. वडील ट्रक ड्रायव्हर तर आईने भाजी विकून या विशालचे शिक्षण केले. आजी आजोबां यांना शेतीची अवजारे बनवण्यात विशाल मदत करत असे. विशेष म्हणजे विशालने दहावी व बारावी परिक्षेत देखील शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता. आपला मधवा भाऊ हुशार आहे. यासाठी त्याच्या दोन मोठ्या व लहान भावांनी इतरत्र नोकऱ्या करत आपल्या भावाच्या शिक्षणाला मदत केली.

      इंजिनियरिंग शिक्षण झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो अनेक स्पर्धा परीक्षा देत होता. थोड्या थोड्या गुणांनी त्याचे यश त्याला हुलकावणी देत होते. त्याचे मित्र देखील त्याला प्रोत्साहन देत त्याची उर्जा वाढवत राहिले. सात वर्षाच्या अखंड व खडतर प्रवास शेवटी संपला. 15 सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र आधिकारी परीक्षेच्या निकालात त्याची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यासह लोणावळा मळवली पाटण परिसरातून त्यांच्या यशाची चर्चा सुरु असून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

इतर बातम्या