Breaking news

गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या स्वागता निमित्त व हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणार्थ लोणावळ्यात 30 मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन

लोणावळा : गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या स्वागता निमित्त व हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणार्थ लोणावळ्यात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्यावतीने रविवारी 30 मार्च रोजी भव्य दुचाकी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळ्यातील पुरंदरे शाळा मैदान या ठिकाणाहून सकाळी नऊ वाजता या शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे. आय सी आय सी बँक समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा पुतळा चौक, कुमार रिसॉर्ट पासून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खंडाळा, खंडाळा येथून पुन्हा माघारी फिरून गवळीवाडा नाका, वलवन गाव, वरसोली टोल नाका येथून वळसा घेत पुन्हा नारायणी धाम पोलीस चौकी शेजारून तुंगार्ली गावातील जाखमाता मंदिरासमोर या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. मागील बारा वर्षांपासून लोणावळा शहरामध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागता निमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्यावतीने या भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. 

      या वर्षी देखील या शोभा यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र, भारत माता यांचे रथ असणार आहेत. दरवर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागामधील हजारो हिंदू बांधव महिला व लहान मुले या शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी होत असतात. यावर्षी देखील त्याच पद्धतीने सर्व हिंदू बांधव भगिनी लहान मुले या सर्वांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत या शोभायात्रेमध्ये सहभागी घेत हिंदू धर्म संस्कृती व धर्म रक्षणासाठी एकत्र यावे असे आवाहन हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

      मागील आठवडाभरापासून सह्याद्री नगर हुडको येथील मैदानावर शोभा यात्रे संदर्भातील कामांची तयारी सुरू आहे. प्रत्येक दुचाकी गाडीला भगवा ध्वज लावण्यात येणार आहे. हे ध्वज तयार करण्याचे काम मैदानावर सुरू आहे. त्याच प्रकारे ज्या मार्गावरून शोभायात्रा जाणार आहे त्या मार्गावर जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. रस्त्यावर शोभायात्रेचा मार्ग दाखवणारे दिशादर्शक चिन्ह लावण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे ठरवून दिलेल्या क्रमा प्रमाणेच शोभायात्रेमध्ये दुचाकी वाहने असतील, कोणीही वाहने ओव्हरटेक करू नये, हॉर्न वाजू नये, शिस्तीचे पालन करावे, ठरवून दिलेल्या घोषणाच देण्यात याव्यात अशा काही मार्गदर्शक सूचना समितीच्या वतीने करण्यात आले आहेत. 

      मावळ तालुक्यामधील ही सर्वात मोठी शोभायात्रा असल्याने जास्तीत जास्त हिंदू बांधव भगिनी यांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवावा व आपली उपस्थिती दर्शवावी तसेच सर्वांनी सकाळी ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी पुरंदरे शाळा मैदान या ठिकाणी उपस्थित रहावे असे देखील आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या