Maval News : राजकीय आकसातून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे - आमदार सुनिल शेळके

मावळ माझा न्युज : जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्येची शुक्रवारी घडलेली घटना ही निंदनीय आहे. अशा प्रकरणात त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असताना काहीजण या घटनांचे राजकारण करत आहे. काल रात्री मी व माझ्या भावावर या हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय आकसातून दाखल करण्यात आला असून त्यामागे कोण आहे हे समोर येणे गरजेचे आहे असे मत आमदार सुनिल शेळके यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आमदार शेळके म्हणाले, मला माझ्या मायबाप जनेतेने जनेतेची सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार केले आहे, कोणाच्या जीवावर उठण्यासाठी नाही. किशोर आवारे व मी आम्ही एकत्र राजकारणात काम केले आहे. आमच्यात मतभेद होते मात्र मनभेद नव्हते. कोणाच्या जीवावर उठण्यापेक्षा मी राजकारणातून बाहेर होईल अशा शब्दात आमदार सुनिल शेळके यांनी संताप व्यक्त करत पोलीस यंत्रणेला संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सामाजिक जीवनात दोन दशके मी काम करत आहे, आजपर्यंत माझ्यावर एक एनसी देखील दाखल नाही. माझ्या सोबत पोलीस गार्ड असतात, मला गुन्हागारांशी संबध ठेवण्याची गरज नाही. माझा भाऊ रात्रंदिवस काम करत माझ्या राजकीय वाटचालीला आर्थिक पाठबळ देत आहे म्हणून त्याला टार्गेट केले जात आहे. आम्हाला राजकीय बदनाम करण्याचे काम सुरु आहे. असे घाणरडे राजकारण कोणी करु नये. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी मावळ तालुक्यातील परिस्थिती त्यांना सांगणार आहे. येथील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. माझ्या घरात देखील अशी घटना घडली आहे. ज्या कुटुंबात असा प्रकार घडतो, त्याच्यावर काय बितते हे मला माहित आहे अशा भावना आमदार शेळके यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच मावळ तालुक्यातून त्याच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमण्यास सुरुवात केली. मात्र शेळके यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. पोलीस प्रशासन त्याचे काम करत आहे. सीसीटीव्ही मधून मारेकर्यांचे चेहरे समोर आले आहेत. लवकरच हत्या का, कोणी व कशासाठी केली हे उघड होईल.