Breaking news

राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी मावळातून १०० विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना; गणवेश आणि ओळखपत्रांमुळे ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोणावळा : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील विशेष 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातून १०० विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना झाल्या. पूर्ण गणवेश  आणि ओळखपत्रांसह उपस्थित राहिलेल्या या विद्यार्थिनी संपूर्ण कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.

      पुणे आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते, परंतु केवळ मावळ तालुक्यातील विद्यार्थिनींनी एकसारखा गणवेश आणि ओळखपत्र धारण केले होते. या विशेष शिस्तीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मावळच्या विद्यार्थिनींचे वेगळेपण उठून दिसले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना राहुल गांधी यांना अगदी जवळून पाहण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. यामुळे मुलींमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर सर्व विद्यार्थिनींना विशेष बसद्वारे सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.

      या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश वसंत काजळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोणावळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे प्रदेश सदस्य प्रमोद गायकवाड, मावळ-लोणावळा शहरी काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संभाजी लेंडघर, आणि जिल्हा सचिव शांताराम नरवडे यांनी विशेष सहकार्य केले.

या आयोजनामुळे मावळ तालुक्यात तसेच सहभागी विद्यार्थिनींमध्ये एक नवीन उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या