Breaking news

वसंत व्याख्यानमाला | घरातील चुली वेगळ्या झाल्या तरी मनाची चुल वेगळी होऊ देऊ नका - डॉ. हमीद दाभोळकर

लोणावळा : घरातील चुली वेगळ्या झाल्या तरी मनाची चुल वेगळी होऊ देऊ नका कारण नात्यांमधील ऊब कमी झाल्याने मानसिक ताण वाढत आहे असे मत मानसोपचार तज्ञ डॉ हमिद दाभोळकर यांनी व्यक्त केले. लोणावळा शहरात सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी मनाचे आरोग्य स्वतःचे व समाजाचे या विषयावर मार्गदर्शन केले.

    यावेळी बोलताना डॉ. हमिद दाभोळकर म्हणाले, वाढलेल्या अपेक्षा त्यातच अपयश पचवता येत नाही, वाढलेली नकारात्मकता, वाढलेली स्पर्धा व तुलना, भौतिक उपलब्धता, आयुष्यात आलेली सुबकता या सर्व गोष्टींमुळे सद्या ताण तणाव वाढला असून मनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज 140 करोड लोकसंख्या असलेल्या भारत देशात 5 पैकी 1 व्यक्ती मानसिक रुग्ण आहे व त्यांच्यावर उपचार करणारे रुग्ण देशात केवळ 9 ते 10 हजार इतकेच आहेत. जगात देखील हिच परिस्थिती आहे.

       अध्यात्मिक बुवा, बाबा हे वाढलेल्या ताण तणावाचा फायदा घेत आहेत. मानसिक ताणा प्रमाणे त्यांची देखील संख्या वाढली आहे. सुखी समाधानी माणूस त्यांच्याकडे जात नाही. ज्यांना मानसिक समाधान नाही तेच अशा मंडळींकडे जातात. व त्यांच्याकडे जाणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे व मानसोपचार तज्ज्ञांकडे मात्र लोक कुचेष्टेने पाहिले जाते. समाजाला शरीराच्या आजाराचा कमीपणा वाटत नाही मात्र मानसिक आजाराबाबत चर्चा करताना कमीपणा वाटतो. आज देशात दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख लोक आत्महत्या करत आहेत. त्यामध्ये 15 ते 35 वयोगटातील 50 टक्के नागरिक आहेत. 75 टक्क्यां पेक्षा जात मानसिक आजार 20 वर्षापर्यंत होत असतो व त्याचा परिणाम आयुष्यभर होतो. समाजात याबाबतीत जागृती होणे गरजेचे आहे. 

      दाभोळकर म्हणाले, जखम झाल्यावर जसे शारीरिक प्रथमोपचार केले जातात तसेच मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी भावनिक प्रथमोपचार केले पाहिजे. मानसिक उपचाराची लक्षणे ओळखता आली पाहिजे. त्याचे विज्ञानवादी पद्धतीने निराकरण करता आली पाहिजे. मानसिक आरोग्य सुद्दृढ ठेवण्यासाठी (मन शांत ठेवण्यासाठी) नात्यांमध्ये भावनिक गुंतवणूक महत्वाची असते. समाधानासाठी गरजांची एक मर्यादा ठेवून घ्या, आयुष्याचा वेग कमी करा, मनाला मोकळा वेळ द्या, एकांतात रहायला शिका, आपल्या परंपरांमध्ये अनेक गोष्टी आहेत त्या शिका व आत्मसात करा. व्यसनापासून दूर रहा, मोबाईलचे व्यसन मानसिक आजाराचे कारण बनू लागले आहे, पुरेशी विश्रांती घ्या, रोजच्या रोज व्यायाम करा असा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला.



इतर बातम्या