Breaking news

मावळ मतदार संघातील मतदारांचे प्रश्न सोडवण्यात खासदार बारणे पूर्णतः अपयशी ठरले आहेत - मच्छिंद्र खराडे

लोणावळा : विद्यमान खासदारांची उमेदवारी काढून दहा वर्षापूर्वी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मावळात श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली मात्र निवडून आल्यानंतर ते मतदार संघात फिरकले सुद्धा नाही. कोणतीच विकासकामे केली नाहीत, नागरिकांशी संवाद ठेवला नाही व प्रश्न देखील सोडविले नाहीत, उलट नवीन प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत, अशा निष्क्रिय खासदाराला आता उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्याने त्यांनी गद्दारांच्या सोबत घरोबा साधला. मात्र यावेळी मावळ लोकसभा मतदार संघात परिवर्तन हे घडणार आहे. ही निवडणूक येथील मतदारांनी हातात घेतली आहे. प्रत्येकाच्या मनात बारणेंच्या विषयी रोष आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठी फिरणारे महायुतीचे पदाधिकारी देखील खाजगीत हा रोष व्यक्त करत आहेत. म्हणून प्रचार करताना ते बारणे यांच्या नावाचा उल्लेख देखील करत नाहीत. मोदींना पाहून मत द्या असे सांगायची वेळ त्यांच्यावर आली आहे. मावळातील मतदारांचे प्रश्न सोडविण्यात बारणे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मतदार संघात एकही नवीन उद्योग त्यांनी आणला नाही. शेतकरी, युवक, कामगार, व्यवसायिक यापैकी कोणाचेच प्रश्न सोडविले नाही. अशा निष्क्रिय खासदाराला यावेळी घरी बसवण्याची वेळ आली असल्याचा निर्धार आता मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनीच केला असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक व माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी केली आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या कार्यकर्ता संवाद दौऱ्याची सांगता आज लोणावळ्यात झाली त्यावेळी त्यांनी बारणे यांच्यावर निशाणा साधला.

     यावेळी सहकार महर्षी माऊली दाभाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, गुरव समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगरसेवक सुनील इंगुळकर, युवक नेते फिरोज बागवान, नंदकुमार कोतूळकर, दादा भोंगाडे, जाकिर शेख, भालचंद्र खराडे, राजू गवळी, सुधीर शिर्के, शुभम जोशी, सुनील मोगरे, लक्ष्मण दाभाडे, दत्ता दळवी, निखिल तिकोने आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना संभाजी राक्षे म्हणाले, सर्वसामान्य जनता व मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण मतदारांना पटलेले नाही, त्यामुळे मतदारांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. विभागवार बैठकांमधून हाच सुर ऐकायला मिळत आहे. वाघेरे यांना संधी दिली तर मावळचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही. पिंपरी चिंचवड मधील विकास हे त्याचे उदाहरण आहे. नंदकुमार कोतूळकर म्हणाले, भुल थापा देऊन सत्तेवर आलेले हे भाजपा सरकार आहे. देवाच्या नावावर मते मागत आहे. मावळातील कंपन्या बाहेर गेल्या आहेत, हे शेतकरी विरोधी सरकार, शेती मालावर त्यांनी जीएटीलावला आहे. यावेळी मावळात मतदारांनी गुणवत्ता पाहून संजोग वाघेरे यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. शंकर शिर्के म्हणाले संपूर्ण राज्यात भाजपाच्या विरोधात संतापाची तर उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या विषयी सहानुभूतीची लाट आहे. मावळात देखील तीच परिस्थिती असल्याने यावेळी वाघेरे हेच विजयी होतील अशी खात्री व्यक्त केली. प्रमोद गायकवाड म्हणाले, दहा वर्ष बारणे खासदार आहेत  मात्र त्यांच्या कामातील अभाव सर्वांनी पहिला आहे. कोरोना पासून बंद असलेल्या काही लोकल गाड्या आजुनही सुरू झालेल्या नाहीत, मेल गाड्या लोणावळ्यात थांबत नाहीत, वारंवार खासदारांकडे पाठपुरावा केला मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, शेवटी या शहरातील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले त्याकडे देखील बारणे यांनी कानाडोळा केला. मात्र काही गाड्या सुरू होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी बारणे उगवले. अशा संधीसाधू लोकांनां आता घरी बसवा व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणार, आपल्या हाकेला धावणाऱ्या व्यक्तीला यावेळी खासदार करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. राज्यात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम भाजपा करत आहे. असा आरोप देखील त्यांनी केला. 

       सुरेश चौधरी म्हणाले, मागील दहा वर्षात बारणे यांनी काय कामे केली हे विरोधकांनी सांगावे, मावळात आलेली मोठी कंपनी देखील गुजरातला गेली. संजोग वाघेरे यांना खानदानी वारसा आहे ते काम केल्याशिवाय राहणार नाही. आज पिंपरी चिंचवड मध्ये जी कारखानदारी आली त्यामध्ये वाघेरे परिवाराचा मोठा वाटा आहे. समाज हिताचे काम करणारे ते घराणे आहे. ते नामधारी नाहीत, मी पक्ष वाढीसाठी नाही तर माझी प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी खासदार आहे असे बारणे स्वतः सांगत आहे असा आरोप चौधरी यांनी केला. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मितभाषी स्वभावाचा उमेदवार वाघेरे आहे. घरात आग लावायचा धंदा भाजपाने उत्तम केला आहे, त्यामुळे जनता यावेळी भाजपला माफ करणार नाही. 

      निखिल कवीश्वर म्हणाले, ही देशाची निवडणूक असल्याने मावळच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी खासदार महत्वाचा आहे. मागील खासदाराला याबाबत वारंवार प्रस्ताव दिले मात्र त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. ते अतिशय निष्क्रिय आहेत. मावळच्या विकासासाठी त्यांचा काहीच उपयोग दहा वर्षात झाला नाही. लोणावळ्यात नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले व काही गाड्या सुरू होताच माझं रेल्वे मंत्री व अधिकारी एकत नाही सांगणारे खासदार क्रेडिट घ्यायला पुढे आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामासाठी 5 ते 7 कोटीचा निधी लागत असताना केवळ दिखावा म्हणून 30 ते 35 लाखाच्या निधी जाहीर केला व भूमिपूजन केले मात्र दोन वर्षात पुढे काही झाले नाही व निधी कोठे गेला हे सुध्दा कोणाला माहित नाही. शहरातील जे प्रश्न सोडवायला पाहिजे ते त्यांनी सोडवलेच नाही. अशा निष्क्रिय व्यक्तीला का तिसऱ्यांदा निवडून द्यायचे. लोणावळ्यातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम 7 ते 8 वर्ष झाले तरी आजुन रेंगाळला आहे. याबाबत त्यांनी कधीच पाठपुरावा केला नाही. केवळ मनात येईल तेव्हा आढावा बैठका घेतल्या पण त्यांतून देखील काहीच निष्पन्न झाले नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हायवेची लेन वाढवण्यासाठी काहीच केले नाही. कुसगावं व वरसोली येथे एक किमी अंतरावर दोन टोल नाके आहेत, एक बंद करा असे सांगितले मात्र तेथेही कधी लक्ष दिले नाही. अशा या निष्क्रिय व्यक्तीला आता घरी बसवा हे आम्ही प्रत्येक मतदारांना भेटून सांगत आहे असे कवीश्वर म्हणाले. तसेच ही निवडणूक हातातून जाणार असे दिसू लागल्याने भाजपाने निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात हिंदू मुस्लिम हा जातीय मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप त्यांनी केला.

     फिरोज बागवान व मच्छिंद्र खराडे यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर माजी नगराध्यक्ष राजू गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इतर बातम्या