Railway News : पुणे मुंबई प्रवाशांनी कुणाचं घोडं मारलंय; रेल्वे प्रवासी संघटनेकडून संताप व्यक्त

पिंपरी चिंचवड : रेल्वे प्रशासनाने 25.12.2021 पासुन पंचवटी एक्सप्रेस तर 19. 01. 22 च्या परिपत्रकानुसार 1 फेब्रुवारी पासून राज्यराणी एक्सप्रेस या गाड्यांना अनारक्षित जनरल डबे तसेच मासिक/त्रैमासिक पासची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ नाशिक मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी होणार आहे. त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मध्येही जनरल डब्बे सुरू करून मासिक पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. वरील पार्श्वभूमीवर, पुणे मुंबई प्रवाशांनी कुणाचं घोडं मारलंय असा संताप पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणार्या दुजाभावा विरोधात रेल्वे प्रवाश्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. इतर विभागातील प्रवाशांना पास आणि जनरल तिकिटाची सुविधा आणि पुणे मुंबई पुणे प्रवाशांकडून अनेकदा मागणी करून ही त्यांना पास आणि जनरल तिकाटाची सुविधा का नाही. त्यांच्यावर हा अन्याय का..त्यांना वेगळा न्याय का..हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन, पुणे-मुंबई-पुणे दरम्यान नोकरी धंद्यासाठी दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पासची सुविधा पूर्ववत सुरू करण्याबाबत अनेकदा विनंती करण्यात आली आहे. तथापि, अद्याप सदर सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने कसलाही दुजाभाव न करता, वरील प्रमाणे मासिक पासची सुविधा, सिंहगड एक्सप्रेस व डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस या गाड्यां करीताही पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे इक्बाल (भाईजान) मुलाणी
अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड, सदस्य मा.केंद्रीय रेल्वे पुणे विभाग सल्लागार समिती यांनी केली आहे.