आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुविधांसाठी काटेकोर नियोजन करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध शासकीय विभागांनी तातडीने नियोजन सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी दिले. “वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याला असुविधा होणार नाही, याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक नियोजनावर भर
डॉ. डुडी म्हणाले, “यंत्रणांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून नियोजन बैठका लवकर घेण्यात येत आहेत. आळंदी व देहू संस्थानकडून आलेल्या सूचना गांभीर्याने विचारात घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल.” पुढील बैठक मे महिन्यात घेण्यात येणार असून, याआधी संबंधित विभागांनी आपापल्या क्षेत्रातील तयारीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
सुविधांमध्ये मोठी वाढ
यावर्षी आरोग्य सेवा, शौचालये, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. फिरती ई-टॉयलेट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी खास संनियंत्रण यंत्रणा आणि मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे. या टॉयलेट्सवर QR कोड लावण्यात येणार असून, वापरकर्ते थेट प्रशासनाला अस्वच्छतेची माहिती देऊ शकतील.
तांत्रिक सोयी व वाहतुकीची योजना
मोबाईल नेटवर्क अडचण येऊ नये म्हणून वारी मार्गावर नेटवर्क बूस्टर्स बसविण्यात येणार आहेत. तसेच पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन होणार आहे. अपूर्ण महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी NHAI ला सूचना करण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा अखंड राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणार
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा म्हणून संबंधित तालुक्यांमध्ये प्रांताधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे.
उपस्थित मान्यवर
बैठकीस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विक्रमसिंह मोरे, वैभव मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, पुणे शहरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, दौंड प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.