Breaking news

सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांची शिमला, कुल्लू, मनाली येथे अविस्मरणीय सहल

लोणावळा : शिक्षकांचे जीवन हे ज्ञानदान, जबाबदाऱ्या आणि विविध उपक्रमांच्या व्यापाने भरलेले असते. या सगळ्यातून काही निवांत क्षण मिळणं हे खूपच मोलाचं ठरतं. याच उद्देशाने कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज आणि आंबवणे गावच्या आदर्श सरपंच वत्सलाताई वाळंज यांच्या संकल्पनेतून शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी एक खास सहलीचे आयोजन करण्यात आले.

     या सहलीचे आयोजन कॅनरी रिसॉर्टचे चेअरमन मिलिंद वाळंज यांच्या पुढाकाराने करण्यात आले. 5 मे ते 14 मे 2025 या कालावधीत सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे येथील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने आपल्या कुटुंबासह हिमालयाच्या कुशीत वसलेल्या शिमला, कुल्लू आणि मनाली या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचा मनमुराद आनंद घेतला.

     ही सहल म्हणजे केवळ पर्यटन नव्हते, तर निसर्गसौंदर्य, उत्साह, हास्य आणि सहकार्याच्या भावना यांचे अनोखे मिश्रण होते. बर्फाच्छादित डोंगररांगा, थंडीचा गारवा आणि त्यात मिळालेली ऊबदार संगत – हे क्षण शिक्षकांच्या आठवणींच्या पटलावर कायमचे कोरले गेले. संपूर्ण सहलीचे उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन आणि आत्मीयता यासाठी मा. मिलिंद वाळंज सरांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही सहल केवळ यशस्वीच नव्हे तर संस्मरणीय ठरली.

     "ही सहल आम्हाला नवचैतन्याने भरून गेली आहे. या आठवणी शिक्षणाच्या प्रवासात एक सकारात्मक ऊर्जा देतील," असे मत शाळेचे मुख्याध्यापक भटू देवरे यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहलीच्या नियोजनात मनापासून परिश्रम घेतले आणि ती एक टीम म्हणून यशस्वी केली.

इतर बातम्या