Lonavala News l लोणावळा नगरपरिषद लगत असलेल्या कुणेनामा या गावाचा नगरपरिषद हद्दीमध्ये समावेश करावा - श्रीधर पुजारी

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या पश्चिम हद्दीलगत असलेल्या कुणेनामा या गावाचा समावेश लोणावळा नगर परिषदेमध्ये करावा अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रामध्ये श्रीधर पुजारी यांनी म्हटले आहे की लोणावळा नगर परिषदेची स्थापना 17 मार्च 1877 साली झाली. 9 ऑक्टोबर 1984 साली पहिल्यांदा लोणावळा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता सुमारे 125 वर्ष कोणती हद्द वाढ करण्यात आलेली नाही. कुणेनामा ग्रामपंचायतीला अगदी सुरुवातीपासून लोणावळा नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच या गावाच्या व ग्रामपंचायतीच्या हाती मते निर्माण होणाऱ्या कचरा हा देखील लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर विलेवाट केला जातो. या गावांमध्ये कोणतीही बाजारपेठ नसल्याने सर्व नागरिकांना बाजारहाटासाठी लोणावळा शहरामध्येच यावे लागते. तसेच शिक्षणाची व आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांना प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लोणावळा शहरामध्ये यावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करत कुणे नामा या गावाचा समावेश लोणावळा नगर परिषदेमध्ये करण्यात यावा अशी मागणी श्रीधर पुजारी यांनी केली आहे.
लोणावळा नगर परिषदेचे बजेट हे शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांची असल्याने व शासनाकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या स्वरूपात निधी देखील प्राप्त होत असल्याने त्याचा फायदा या गावाला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निश्चितच होऊ शकतो. नगरपरिषद हद्दीमध्ये कुणेनामा गाव समाविष्ट झाल्यास त्या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या सर्व सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतील. या सर्व बाबींचा विचार करत व तेथील नागरिकांच्या मागणीस अनुसरून सदर गावाचा लोणावळा नगरपरिषद हाती मध्ये समावेश करावा असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.