Breaking news

Accident News : लोणावळ्यात दुचाकीचा भिषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

लोणावळा : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेल समोर एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून, दोघे सख्खे साडू होते. दिपक परशुराम पवार (वय-40) व लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय-30, दोघेही रा. सावरोली, खोपोली, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वीटभट्टी कामगारांची नावे आहेत.

      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे साडू लोणावळ्या जवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होते. ते रविवारी काही कामानिमित्त त्यांच्या गावाला मोटार सायकलने (MH 06 AM 6395) गेले होते. रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेल समोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम व शिवा धनगर आणि सरकारी वाहन चालक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत रुग्णवाहिकेतून दोघांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेतील दोन्ही मयतांची नावे व पत्ते माहीत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या कडील मोबाईलच्या माध्यमातून नातेवाईक व ओळखींच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधत नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी या घटनेची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शकील शेख हे करीत आहेत.

इतर बातम्या