Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी
खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली शहराच्या हद्दीमध्ये किलोमीटर 36 येथे आज सकाळी काही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत अपघातानंतर काही काळ पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला भरधाव वेगातील कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकत पुण्याच्या दिशेने येणाऱ्या विरुद्ध लाईन वर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी पाच वाहने कंटेनरला व एकमेकाला धडकल्याने हा विचित्र व भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका स्विफ्ट डिझायर कार मधील दोन जणांचा मृत्यू झाला असून वेगवेगळ्या वाहनांमधील पाच जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी कंपनी, डेटा फोर्स, देवदूत यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढत उपचारासाठी पुढे दाखल केले. तर अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्यात आली दरम्यानच्या काळामध्ये एक्सप्रेस वे वरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.