Breaking news

लोणावळा रेल्वे स्थानकावर दोन एक्सप्रेस गाड्यांना मिळाला थांबा

लोणावळा : मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे व लोणावळा शहर शिवसेना जागरूक नागरिक मंच व विविध राजकीय व सामाजिक संघटना यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर लोणावळा रेल्वे स्थानकावर दोन एक्सप्रेस गाड्यांना नव्याने थांबा देण्यात आला आहे. 12163 LTT- Chennai to LnL time. 8.50 pm व 12164 Chennai- LTT to LNL time. 12.40 Afternoons. या दोन गाड्यांना हा थांबा देण्यात आला आहे. 

      मुंबई पुणे लोहमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून लोणावळा रेल्वे स्थानकाची ओळख आहे. भारतातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विकास मध्य रेल्वे व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळामध्ये लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या बहुतांश सर्व लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या ह्या थांबवणे बंद करण्यात आले होते. कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी मुंबईहून पुण्याकडे व पुण्याहून मुंबईकडे जाताना सर्व मेल एक्सप्रेस गाड्या ह्या लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये थांबत होत्या. कोरोना काळानंतर मात्र हा थांबा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले होते. लोणावळा रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा व लोणावळा पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांच्या सेवा पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी जागरूक नागरिक लोणावळा मंचच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेत त्यावेळी तात्काळ पाच गाड्यांना थांबा देण्यात आला होता व दोन लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. जागरूक नागरिक मंचा प्रमाणेच लोणावळा शहर शिवसेना व इतर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना शाळा यांनी देखील रेल्वे प्रशासनाला मेल एक्सप्रेस गाड्या थांबवण्याबाबत व दुपारच्या वेळेतील लोकल सुरू करण्याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. या सर्वांची मागणी व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने केलेला पाठपुरावा यानंतर या दोन गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याची माहिती 10 ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे. याविषयी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, रेल्वे प्रशासनाकडे माझा पाठपुरावा सुरू आहे पूर्वीप्रमाणे सर्व लोकल गाड्यांच्या सेवा व इतर मेल एक्सप्रेस गाड्या यांना देखील लवकरच थांबा मिळेल.

इतर बातम्या