Breaking news

श्री एकविरा देवी देवस्थान परिसरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती; वनमंत्री गणेश नाईक यांचे तातडीने परवानग्या देण्याचे आदेश

लोणावळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळ तालुक्यातील प्रसिद्ध श्री एकविरा देवी देवस्थान परिसरातील विकासकामे व आवश्यक भौतिक सोयीसुविधांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाविकांच्या सुविधेसाठी रखडलेल्या विविध विकासकामांना तातडीने परवानगी देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परवानगीअभावी भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली अनेक कामे प्रलंबित होती. यामध्ये पायथा मंदिर ते वाहनतळ या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती, वाहनतळ ते मंदिर पायऱ्यांचे रुंदीकरण, पायऱ्यांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने रेलिंग बसवणे, तसेच भाविकांसाठी – विशेषतः महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी – यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी लागणाऱ्या जागेला तत्काळ मंजुरी व परवानगी देण्याचे स्पष्ट आदेश वनमंत्री नाईक यांनी बैठकीत उपस्थित संबंधित वन अधिकाऱ्यांना दिले.

वनमंत्र्यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही विकासकामे आता लवकरच मार्गी लागणार असून निर्धारित वेळेत ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नवरात्रोत्सव व इतर सणांच्या काळात गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बैठकीस मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, खजिनदार संजय गोविलकर यांच्यासह ट्रस्टचे संपूर्ण संचालक मंडळ व संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या