लोणावळा नगरपरिषदेकडून भांगरवाडी गणपती मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाई; कारवाईदरम्यान व्यावसायिक व कारवाई पथक यांच्यात शाब्दिक वाद
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने 18 नोव्हेंबर पासून लोणावळा शहरामध्ये रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे. कुमार चौक ते लोणावळा नगरपरिषद व नगरपरिषद ते इंद्रायणी पूल दरम्यान कारवाई झाल्यानंतर आज 25 नोव्हेंबर रोजी भांगरवाडी परिसरात ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. गणपती मंदिर परिसरात व्यवसायिकांचे वाढीव अतिक्रमण काढत असताना व्यवसायिक व कारवाई पथक यांच्यात शाब्दिक वाद झाले मात्र कारवाई पथकाने आपली कारवाई सुरूच ठेवत अतिक्रमणे काढली आहेत. व्यवसायकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता ही कारवाई केली असल्याचा आरोप केला आहे. ही कारवाई करत असताना एक ठिकाणी पाण्याची लाईन फुटली गेली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करत असताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी नगरपरिषद हद्द या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर ही अतिक्रमण कारवाई सुरू आहे. बाजारभागातील या मुख्य रस्त्यावर दुतर्फा असलेल्या दुकान व्यवसायिकांनी आपल्या दुकानांचे ओटी हे नगर परिषदेच्या सार्वजनिक गटारींवर बांधत अतिक्रमणे केली आहेत तसेच दुकानांचे शेड देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने सदरचे शेड व वाढीव ओटे काढले जात आहेत. रस्त्यावर असलेल्या लहान-मोठ्या टपऱ्या देखील काढण्यात आल्या आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस कारवाई थांबवत नागरिकांना स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर देखील काही अतिक्रमणे शिल्लक असल्याने त्यावर अखेर जेसीबी फिरवण्यात आला. लोणावळा नगरपरिषद रुग्णालयासमोरील नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाची सुरक्षा भिंत देखील पाडण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक स्वागत करत असले तरी कारवाई केलेल्या भागात नगर परिषदेने तातडीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे व पुन्हा नव्याने अतिक्रमणे होणार नाहीत याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
अतिक्रमणे वाढत असताना नगरपरिषद प्रशासन व संबंधित बीट अधिकारी हे बघ्याची भूमिका घेतात तर कारवाईदरम्यान काही व्यवसायिकांनी या अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचा देखील आरोप केला आहे. अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हप्ते खोरीमुळे खरंतर लोणावळा शहरामध्ये अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याचा देखील आरोप लोणावळ्यातील राजकीय मंडळी व्यावसायिक यांनी एकत्रित येत केलेल्या लोणावळा बंद दरम्यान करण्यात आला आहे. अतिक्रमणे होताच क्षणी ती निष्कासित केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्याची वेळ देखील येणार नाही व ही अतिक्रमण कारवाई करताना जो नाहक पैसा वाया जात आहे तो देखील वाया जाणार नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये ही अतिक्रमणे होत आहेत त्याच अधिकाऱ्यांकडून या कारवाईची रक्कम वसूल करण्यात यावी नागरिकांचा कररुपी पैसा यामध्ये वापरू नये असे देखील मागणी सजक नागरिकांकडून पुढे येत आहे. लोणावळा शहरातील वाढीव अतिक्रमणाला नगरपरिषदेचे अधिकारीच मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचा थेट आरोप प्रशासनावर होत आहे.
अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
लोणावळा शहरात केवळ अतिक्रमण ही समस्या नसून अनाधिकृत बांधकामांचा देखील मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. नगरपरिषदेची परवानगी घेऊन बांधकामाला सुरुवात केली जाते मात्र अंतिम त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत वाढीव कामे केली जात आहेत. परवानगी व मंजूर नकाशाच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे लोणावळा खंडाळा परिसरात होत आहेत. यावर नगर परिषदेचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. नगर परिषदेचे नगररचना विभागाचे अधिकारी व बीट अधिकारी यांचे व व्यावसायिकांचे असलेले आर्थिक लागेबांधे यामुळे अतिक्रमणांप्रमाणेच शहरात अनधिकृत बांधकामांचा देखील पेव फुटला आहे. शहरात अतिक्रमण कारवाई सुरू असताना या धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार असे देखील प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक उपस्थित करत आहेत. ठिय्या आंदोलन व लोणावळा बंद दरम्यान देखील हा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला आहे.



















