Breaking news

पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन 5 मार्चला सासवडला होणार

पुणे : पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन रविवार, दि. 5 मार्च रोजी सासवड येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते व प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संत सोपानकाका व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत हे एक दिवशीय अधिवेशन संपन्न होणार आहे. 

      या अधिवेशनात ग्रंथालय चळवळ वाढीसाठी ग्रंथदिंडी, साहित्यिकांचा मेळावा, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, खुले अधिवेशन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रंथालय चळवळ राबविताना येणाऱ्या अडचणी शासनाकडे मांडण्यात येणार आहेत. यावेळी ग्रंथालयाच्या विशेष अधिवेशन स्मरणिकेचे प्रकाशन करून आदर्श कार्यकर्ता, आदर्श ग्रंथालय, आदर्श ग्रंथपाल आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने अधिवेशनाची सुरुवात होणार असून 11 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप हे संमेलनाध्यक्ष व विजयराव कोलते हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. 

     यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, माजी आमदार उल्हासदादा पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक अर्चना काळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपांग, ग्रंथमित्र धोंडिबा सुतार गुरुजी, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे, सदाशिव अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, ग्रंथालय संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संभाजीराव पाटणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार पवार, माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष एकनाथराव पवार, पुणे विभाग व सातारा जिल्हा प्रमुख कार्यवाह नंदा जाधव, सोलापूर जिल्हा प्रमुख कार्यवाह साहेबराव शिंदे, सांगली जिल्हा प्रमुख कार्यवाह संतोष शिंदे, कोल्हापूर जिल्हा प्रमुख कार्यवाह रामचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

      दुपारी 2 ते 3 या वेळेत ग्रंथालय चळवळीची सद्यस्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील हे परिसंवादाचे अध्यक्ष असून यामध्ये साहित्यिक वि. दा. पिंगळे, कवयित्री अस्मिता जोगदंड-चांदणे, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भीमराव पाटील हे सहभाग घेणार आहेत. दुपारी 3 वाजता खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते खुले अधिवेशन व समारोप समारंभ होणार आहे. साहित्यिक व पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष यशवंत पाटणे हे अध्यक्षस्थानी असून समारोप प्रसंगी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

       पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष विजय कोलते, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्याध्यक्ष चंद्रशेखर कपोते, उपाध्यक्ष मार्केंडेय मिठापल्ली, राजू घाटोळे, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले, विलास चोंधे, कोषाध्यक्ष संतोष गोफणे, अधिवेशन समितीचे अध्यक्ष अरुण दांगट, संचालक रमेश सुतार, संचालक हनुमंत देवकर, स्वीकृत संचालक पुंडलिक म्हस्के, शरद पांगारे, दौंड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र दरेकर, आंबेगाव तालुकाध्यक्ष व पुरस्कार समितीचे अध्यक्ष रामदास पालेकर उपस्थित होते.

इतर बातम्या