Breaking news

लोणावळ्यासह मावळात मुसळधार; भाजे गावातील 'स्वराज्य नगरी'ला पाण्याचा वेढा, स्थानिक तरुणांनी जीवाची परवा न करता १५ ते १६ जणांना वाचवले!

लोणावळा : लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दि. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या या अतिवृष्टीमुळे लोणावळा शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

     मावळ तालुक्यातील भाजे गावातील 'स्वराज्य नगरी' परिसराला या पावसाचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे या भागातील घरांना चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडला होता. पुराचे पाणी इतक्या वेगाने वाढले की, बघता बघता प्रत्येक घरामध्ये छातीपर्यंत पाणी शिरले. यामुळे घरात असलेले लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आतमध्येच अडकून पडले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक तरुणांचे धाडस आणि बचावकार्य

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाजे गावचे माजी सरपंच महेशभाऊ टकले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रताप गरवड, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे, सचिन खंडागळे आणि स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतानाही आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या सर्वांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

      छातीइतक्या पाण्यातून वाट काढत या धाडसी पथकाने घरामधून लहान मुले आणि वृद्धांसह जवळजवळ १५ ते १६ लोकांना यशस्वीरीत्या आणि सुखरूपपणे बाहेर काढले. सुरक्षित बाहेर काढलेल्या सर्व नागरिकांची राहण्याची व खाण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून, संकटसमयी देवदूतासारख्या धावून आलेल्या या स्थानिक तरुण आणि लोकप्रतिनिधींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, लोणावळा आणि मावळ परिसरात पावसाचा जोर अद्याप कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

इतर बातम्या