मोठी बातमी l भिकमुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा राज्यस्तरीय निर्धार; भीक मागणाऱ्यांचे होणार पुनर्वसन
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे..
राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसन
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
सर्वेक्षण आणि सरकारी लाभ
तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशारा
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.





















