Breaking news

‘जर्मन भाषा गुरु’ पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक — विलास भेगडे

आकुर्डी (प्रतिनिधी): ‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल. सर्वांनी हे पुस्तक वाचून त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मावळ पत्रकार संघाचे सल्लागार विलास भेगडे यांनी केले.

      करियर हब टेक्नॉलॉजीचे संस्थापक प्राचार्य कैलास गाढे यांच्या ‘जर्मन भाषा गुरु’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप पांडुरंग देशमुख (डी. वाय. पाटील विद्यापीठ, आंबी, पुणे), समाजसेवक चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, विजय पाटील, गोविंद पाटील तसेच विशेष अतिथी म्हणून लोकमत पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ उपसंपादक योगेश्वर माडगूळकर उपस्थित होते.

      आपल्या मनोगतात माडगूळकर म्हणाले, “‘जर्मन भाषा गुरु’ हे वाचनीय पुस्तक असून, गाढे सरांनी जर्मन शिकवताना मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे विद्यार्थी परकीय भाषा शिकतानाच मातृभाषेचा अभिमान जपत आहेत,” असे ते म्हणाले.

मुख्य पाहुणे डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने मिळविलेले यश हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे.” या सोहळ्यात श्वेता गाढे, गणेश आनेराये, कृष्णाकांत सरनाईक, अनिकेत सूर्यवंशी यांसह करियर हब टेक्नॉलॉजीच्या शिक्षकवर्गातील सदस्य उपस्थित होते.

      समारोप प्रसंगी प्राचार्य कैलास गाढे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत सांगितले की, “‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या