राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समिती 2023 ची पहिली बैठक नुकतीच मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
समितीच्या सर्व म्हणजे 27 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतमोजणीत श्री. जोशी यांना 19, तर श्री. जगदाळे यांना 8 मते मिळाली. मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. श्री. जोशी हे तीन दशकांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ते दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहसंपादक आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे दोन वेळेस अध्यक्षपद आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. महासंचालक श्रीमती भोज यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांच्यासह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी उपस्थितांना धन्यवाद देत पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. संचालक डॉ. तिडके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी तसेच सर्वांचे आभार मानले.