Breaking news

समिता गोरे ‘फेस ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानीत

पिंपरी : ‘मिसेस इंडिया वन इन मिलियन 2021’ या राष्ट्रीय स्पर्धेत वाकड येथील समिता गोरे यांना ‘फेस ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुरस्कार मिळविणार्‍या त्या पहिल्या पिंपरी-चिंचवडकर ठरल्या आहेत. पिस्टल-शूटिंगच्या त्या राष्ट्रीय खेळाडू असून लग्नाच्या 21 वर्षांनंतरही त्यांनी राखलेल्या फिटनेसला या पुरस्काराने प्रमाणित केले आहे. उद्योजिका शिखा शर्मा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

राजधानी नवी दिल्लीत या आठवड्यात झालेल्या सदर स्पर्धेत देशभरातून 103 महिलांनी भाग घेतला होता. माजी सौ-विश्वसुंदरी डॉ. अदिती गोवित्रिकर यांनी सेलिब्रेटी जज म्हणून विजेत्यांची नावे घोषित केली. प्रा. अंबिका मागोत्रा, फॅशन डिझाईनर अंजली साहनी, पायल सिंग, हेल्थ डायेटिशियन अर्चना सिन्हा तसेच माजी मिस्टर इंडिया सचिन खुराना, प्रशांत चौधरी आणि बॉलिवूड फॅशन फोटोग्राफर रोहित धिंग्रा यांनी सौंदर्य सादरीकरण स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्वाती दीक्षित आणि प्रशांत चौधरी यांनी आयोजन केले.

     समिता गोरे यांना गतवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला होता. समिता गोरे या पिस्टल शूटिंग कोच आणि स्पोर्टस् डाएटिशीयन म्हणून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही जुळ्या मुली केतकी आणि कस्तुरी या देखील पिस्टल खेळाडू आहेत. पती राजेंद्र गोरे हे महावितरण कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल विचारले असता समिता गोरे म्हणाल्या, की त्यांना लहानपणापासूनच सौंदर्य स्पर्धेचे कुतूहलयुक्त आकर्षण होते. कोविड काळात खेळाचा सराव मागे पडत गेल्याने नवीन काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने यास्पर्धेत भाग घेतला. पुरस्कारासाठी आत्मविश्वास ही जमेची बाजू ठरली. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वत:ची सामाजिक ओळख निर्माण करण्यासाठी वेळेचे आणि सरावाचे नियोजन केल्यास ती कोणत्याही वयात स्वत:ला सिध्द करू शकते. त्या पुढे म्हणाल्या, की प्राथमिक फेरीतील मुलाखत, पुढील फेरीत प्रश्नोत्तरे, सामान्यज्ञान, टॅलेंट राऊंड आणि रॅम्पवॉक मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करू शकले. त्यामुळे 'फेस ऑफ महाराष्ट्र'  हा किताब मिळाला.

इतर बातम्या