Breaking news

राहुल शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी सादिक बंगालीला मुंबई खंडणी विरोधी पथकाने केली अटक

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सादिक बंगाली याला मुंबई खंडणी विरोधी पथकाने सापळा रचत नुकतीच अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल व 15 काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत.

   बंगाली याला मुंबईतील कॉटन ग्रीन येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह लोणावळ्यात सादिक बंगाली याच्यावर अनेक गंभिर गुन्ह्याची नोंद आहे. सादिक बंगाली हा लोणावळा गावठाण येथील राहणारा असून लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी खून प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो फरार होता.

    एक जण शस्त्राची विक्री करण्यासाठी कॉटन ग्रीन एअर फोर्स रोड या ठिकाणी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहिती वरून खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मोटारसायकल वरून आलेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही सादिक बंगाली असल्याचे समोर आले. सादिक बंगाली हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीचा शार्प शूटर असून त्याच्याविरुद्ध मुंबई पुण्यात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. लवकरच लोणावळा शहर पोलीस त्याला शेट्टी प्रकरणी तपासणीसाठी ताब्यात घेणार आहेत.

इतर बातम्या