Breaking news

Railway Pass Demand : मुंबई पुणे दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना मासिक व त्रैमासिक पास द्या - रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड : राज्य शासन आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या आपआपसांतील कुरघोडीमुळे रेल्वे प्रवाशांचा फुटबाॅल झाला आहे. वारंवार मागणी करून देखील पुणे मुंबई दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक पास सुविधा सुरु होत नसल्याने रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड, पुणे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

     संघटनेच्या वतीने, मध्य रेल्वे प्रशासन तसेच राज्य शासन स्तरांवर निवेदनांद्वारे अनेकदा विनंती केली आहे. तसेच संबंधितांच्या समक्ष भेटी घेऊन अथक पाठपुरावाही केला आहे. मात्र, संघटनेच्या या जिव्हाळ्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात राज्य शासन आणि मध्य रेल्वे प्रशासन आपापली जबाबदारी झटकत असल्यामुळे, पुणे मुंबई रेल्वे प्रवाशांचा फुटबॉल होत आहे. त्यामुळे सहाजिकच पुणे मुंबई रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीची तीव्र भावना आहे.

    नोकरी व व्यवसायानिमित्त नियमितपणे हजारो प्रवासी दररोज पुणे मुंबई रेल्वेने प्रवास करतात. मुंबईत राहणे किंवा वाहतुकीचे अन्य मार्गही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत. काही रेल्वे गाड्या सुरु झाल्या असल्या, तरी मासिक पास सुविधा सुरु नसल्यामुळे, या प्रवाशांना रोज आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

   कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर, पश्चिम रेल्वे व उत्तर रेल्वे प्रशासनाने त्यांच्या प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक पास देणे सुरु केले असताना, मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्याला विलंब केला जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. तरी, पुणे मुंबई रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मासिक पास सुविधा पूर्ववत तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ईक्बाल मुलानी यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

इतर बातम्या