पुणे मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पास सुविधा सुरु करावी - पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची मागणी

लोणावळा : पुणे मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पास सुविधा सुरु करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या विषयी बोलताना पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलानी (भाईजान) म्हणाले की, मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह देशातील अन्य वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभत असून, 40 टक्क्यांहून अधिक सीट रिकाम्या राहत असल्याचे प्रसिध्दीमाध्यमांतून समजले आहे. या महत्वाकांक्षी एक्सप्रेसचा प्रवास आरामदायक व सुविधायुक्त असला तरी तिचे तिकिट दर अन्य एक्सप्रेस व सुपर फास्ट गाड्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. शिवाय, तिचा वेग देखील अन्य रेल्वे इतकाच असल्याने वेळेत देखील फारशी बचत होत नाही. या कारणांमुळे आता प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. परिणामी, वंदे भारत एक्सप्रेस तोट्यात जाण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासन आता देशातील सर्वच वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट दर कमी करण्याचा विचार करीत आहे.
या पार्श्वभूमीवर, पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला योग्य दरात मासिक पास सुविधा सुरु केल्यास, प्रवाशांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल व पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तरी संघटनेच्या या प्रस्तावाचा रेल्वे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा.