Breaking news

Breaking News l कार्ला फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास पोलिसांची मोठी कारवाई - 48 किलो गांजा जप्त; तीन जणांना अटक

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील तेजस ढाब्यासमोर लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने एका चारचाकी गाडीमधून 48 किलो गांजासह सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांनी दिली. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

        11 जुलै रोजी आयपीएस सत्यासाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली होती की, राष्ट्रीय मार्गावरून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन काही इसम येणार आहेत. त्या माहितीच्या आधारे मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात कार्तिक यांच्या पथकाने सापळा रचला होता. पहाटे 03.05 वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस ढाब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने गाडीची तपासणी केली असता चारचाकी वाहनाच्या डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये 9 लाख 20 हजार रुपये किमतीचा 48 किलो गांजा मिळून आला आहे. 

      नितीन शिवाजी लेहने (वय 38 वर्ष, रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड, संदिपान पाटलोबा गुट्टे (वय 39 वर्ष, राहणार परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड) गणेश सुरेश दराडे (वय 30 वर्ष, राहणार केज, तालुका केज, जिल्हा बीड) यांना याप्रकरणी ताब्यात घेत अटक केली आहे.

        लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.


इतर बातम्या