Breaking news

मोठी बातमी : वेहेरगावात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 16 जणांवर गुन्हा दाखल; 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : मटका खेळावर बंदी असताना देखील चोरून लपवून मटका चालविणारे व खेळणारे अशा 16 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेहेरगावात ही कारवाई केली. यापूर्वी देखील वेहेरगावात मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. कालच्या कारवाई मध्ये 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

       कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. कार्तीक यांना माहिती मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा. पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी त्यांच्या पथकाला 29 डिसेंबर  रोजी वेहेरगाव येथे पाठविले असता, मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली सदरचा मटका खुलेआम सुरू होता. पथकाने याठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट व मटका लावणारे 10 इसम यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम व इतर असा एकूण 2,50,485/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा मटका हा चंद्रकांत देवकर, शंकर बोरकर, निलेश बोरकर, संतोष बोत्रे (रा. वेहेरगाव, ता. मावळ) हे चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दाखल शासकीय फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

     सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे, सचिन गायकवाड, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक रईस मुलानी, पोलीस शिपाई सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या