Breaking news

कामशेत येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; 10 जणांवर गुन्हा दाखल - 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : कामशेत येथे एका जुगार अड्ड्यावर रविवारी लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने छापा मारत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काही इसम अवैधरित्या जुगार अड्डा चालवत  आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सत्यसाई कार्तीक यांनी पथकाद्वारे सबंधित बंदीस्त खोलीवर छापा टाकला. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण 10 इसम ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा एकूण 11,43,470 रू.(अक्षरी अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

       या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 10 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन चे पोसई शुभम चव्हाण करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पीएसआय शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.

इतर बातम्या

संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा ग्रामीण व शहर भागात पोलिसांची कारवाई; 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटख्यासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त