Breaking news

मोठी बातमी : कामशेत बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा गुटखा - पान मसाला जप्त

लोणावळा : कामशेत बाजारपेठेत पोलीसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणांहून तब्बल 2 लाख 53 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा - पान मसाला जप्त केला आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. लोणावळा विभागाचा चार्ज घेतल्यापासून सत्यसाई कार्तिक यांनी मावळातील अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.

        सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून 14 डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयातील पथक व कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून कामशेत बाजारपेठेतील 1) भरत चंपालाल जैन यांच्या मे. शिवम टेडर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ या दुकानाच्या गोडाउनमधून, 2) घिसाराम सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथील मेढो मेडीकलचे बाजुस असलेल्या किराणा दुकानामधून व राहते घरातून, 3) महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स, छत्रपती संभाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे या दुकानामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला इ. पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे.

       त्यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 328, 272, 273 सह अन्नसुरक्षा मानके कायदा, 2006 चे कलम 59 व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत तिन्ही दुकानदारांकडून 2 लाख 53 हजार 248 रूपये किंमतीचा गुटखा, पानमसाला इ. प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलीस उप निरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

     सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार सागर बनसोडे, पोलीस हवालदार बंटी कवडे, पोलीस नाईक रईस मुलाणी, पोलीस शिपाई आशिष झगडे यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या