Kamshet News l ज्वलनशील द्रव्याचा अवैधरित्या साठा केल्याप्रमाणे कामशेत येथे एका व्यवसायकावर पोलिसांची कारवाई

कामशेत : पेट्रोल व रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्याचा अवैधरित्या एका खोलीमध्ये साठा केल्याप्रकरणी कामशेत (Kamshet) येथील एका व्यवसायिकावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक (IPS SATYASAI KARTIK) यांनी दिली.
कामशेत येथील सुभाष गदिया यांनी त्यांच्या एका खोलीमध्ये पेट्रोल व रॉकेल सदृश्य द्रव्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा केला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. या माहितीच्या आधारे 30 जानेवारी रोजी रात्री 8.20 आयपीएस कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथील पुरवठा अधिकारी यांच्या समवेत सदर ठिकाणी छापा मारत सुमारे 80 हजार 300 रुपये किमतीचा अवैधरित्या साठवलेला द्रव्य साठा जप्त केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नित्येंद्र कदम, पोलीस अंमलदार समीर कऱ्हे, पोलीस कॉन्स्टेबल मारकड, माळवे, गारगोठे, ठाकूर, रवींद्र राऊळ, पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तनपुरे, पुरवठा निरीक्षक संदीप तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.