लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
लोणावळा : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि गुन्ह्याचे कलमे कमी करून जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व २० हजार रुपये प्रत्यक्ष स्वीकारणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. १६) सायंकाळी फुड कोर्ट, लोणावळा येथे सापळा रचून रंगेहात अटक केली.
नाथा रामकिसन केकाण (वय ३८, पोलीस उपनिरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९ (ii), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे होता. तपासात मदत करणे, गुन्ह्याचे कलम कमी करणे व जामिनासाठी अनुकूल मदत करण्यासाठी केकाण यांनी वेळोवेळी १ लाख ३० हजार रुपये अगोदरच स्वीकारले होते. त्यानंतर, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्ह्याची चार्जशीट (दोषारोपपत्र) लवकर न्यायालयात पाठवण्यासाठी त्यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची नव्याने मागणी केली. अखेर तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे मार्फत सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार वनिता गोरे, दगडू सोनवणे आणि पोलीस अंमलदार रवी दिवेकर आदींच्या पथकाने केली आहे. कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


















