जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा-खंडाळा येथे ‘बीट प्लास्टिक पोल्यूशन’ अभियानांतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेचे आयोजन

लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या संयुक्त राष्ट्रांच्या यंदाच्या घोषवाक्यानुसार लोणावळा व खंडाळा परिसरात भव्य वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या उपक्रमात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी पर्यावरणपूरक कार्य करण्यात आले.
सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत लोणावळा, खंडाळा परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळे व शहर भागात वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात मुंबई पुणे महामार्ग परिसर, खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवण तलाव, कावेरी फार्म, वलवण नांगरगाव रस्ता, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा धरण गेट, आयएनएस शिवाजी ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय आणि मावळा पुतळा या भागांचा समावेश होता.
या मोहिमेचे उद्घाटन संत निरंकारी मिशनचे स्थानिक पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक देविदास कडू, बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेकडो स्वयंसेवक, सेवादल सदस्य, स्थानिक नागरिक आणि मिशनचे भक्तगण या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले. या अभियानामध्ये पथनाट्ये, सांस्कृतिक सादरीकरणे, जनजागृतीपर संदेश व मानवी साखळीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. हातात फलक व बॅनर घेतलेले स्वयंसेवक ‘प्लास्टिक मुक्त भारत’ या संदेशासह समाजप्रबोधन करत होते.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "या अभियानाचा उद्देश स्वच्छ, हरित व संतुलित पर्यावरण घडवण्यासोबतच नव्या पिढीला पर्यावरणप्रेमी बनवण्याचा आहे. देशातील 18 प्रमुख पर्यटनस्थळांवर हे अभियान एकाच दिवशी राबवण्यात आले असून महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, खंडाळा आणि पन्हाळा ही प्रमुख ठिकाणे होती." या उपक्रमाच्या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक दायित्व आणि पर्यावरणीय सजगतेचा संगम साधत प्रकृती रक्षणासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे.