Breaking news

खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे येथे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अर्थ व मुख्य लेखा अधिकारी विद्यासागर हिरमुखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी-गुलाबसिंग डांगर, बिपीन जगताप, डॉ.मेधा वाके, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत उपस्थित होते.

     ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री. साठे म्हणाले, प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना कार्यप्रवण करणे गरजेचे आहे.  प्रशासनिक निर्णय सत्वर होण्याकरीता ई- ऑफिसच्या माध्यमातून शून्य प्रलंबितता  कार्यप्रणाली राबवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश आहे. यातून मंडळाची एक नवीन ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणात  प्रामुख्याने शासन आणि प्रशासन यामध्ये सुसंवाद साधणे, शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव त्वरित मार्गी लावणे यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनिक कामकाजाचे मूलभूत दुवे, शासकीय पत्रव्यवहार, अभिलेख निर्माण, जतन व संवर्धन आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. 

    मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले, अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामकाजात कार्यक्षम व निष्णात करणे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या