Breaking news

PMPML BUS SERVICE : निगडी लोणावळा PMPML बससेवाचा आजपासून शुभारंभ; नऊ बसेस धावणार

लोणावळा :  निगडी ते लोणावळा PMPML बससेवेचा शुभारंभ आज लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

    निगडी ते कामशेत दरम्यान सुरु असलेली PMPML ची बस सेवा लोणावळ्यापर्यंत करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासून नागरिक, विद्यार्थी व कामगार वर्गांची मागणी होती. आकुर्डी परिसरात कॉलेज व कामासाठी जाणारे कामगार व विद्यार्थी यांची गैरसोय लक्षात घेता ही बससेवा निगडी ते लोणावळा अशी सुरु व्हावी यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्याने आजपासून निगडी ते लोणावळा PMPML च्या नऊ बसेस धावणार असून लोणावळा ते निगडी फक्त 55 रुपये असा प्रत्येकी तिकीट दर राहणार आहे.

   सध्या लोकल सेवा सुरळीत नसल्याने अनेक नागरिक व विद्यार्थी तसेच कामगार तरुणांना प्रवासासाठी खूप कसरत करावी लागत होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ही बस लोणावळा रेल्वे दवाखाना व शांती चौक येथे थांबणार असून याठिकाणी बस स्थानक असणार आहे अशी माहिती विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी दिली आहे. तसेच प्रवाश्यांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाश्यांनी लाभ घ्यावा. आजपासून नऊ बस धावणार असून पुढे नऊच्या अठरा बसेस लोणावळा ते निगडी धावतील असे मत निगडी डेपोचे प्रमुख शांताराम वाघीरे यांनी मांडले आहे.

    या उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, भाजपा गटनेते देविदास कडू, नगरसेवक राजू बच्चे, सुधीर शिर्के, पुजा गायकवाड, मंदा सोनवणे, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, विजय सिनकर, आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मनिष सिसोदिया, पोपटराव भेगडे, दिपाली गोकर्ण, निगडी डेपोचे प्रमुख शांताराम वाघीरे, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, जितेंद्र कल्याणजी, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे अध्यक्ष अनिल गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष तिखे, सुनिल तावरे, गणेश साठे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

इतर बातम्या