Breaking news

देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी ग्राम विकासाला प्राधान्य देण्याची गरज - डॉ. चेतन नरके

लोणावळा : मानिनी फाउंडेशन आणि सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान आणि स्वयंरोजगाराच्या संधी" या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन लोणावळा येथे हॉटेल रिट्रीट हेरिटेज येथे करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमासाठी 'मानिनी फाउंडेशन आणि सरपंच परिषदेच्या पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. पिंपरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, मुंबई, रत्नागिरी या विविध भागातील प्रतिनिधींची लक्षणीय उपस्थिती होती. 

        डॉ. चेतन नरके यांनी आपल्या भाषणामध्ये 'भारताचा जीडीपी दर वाढण्यामध्ये शेती आणि ग्रामीण उद्योगांचा विशेष सहभाग असल्याचे नमूद केले. कोरोना सारख्या जागतिक महामारीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेत शेती उद्योगामुळे भारत आपले अस्तित्व टिकवून आहे. विविध प्रकारच्या इन्फ्रास्टक्चर मध्ये केलेली गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी देशवासीयांना उपलब्ध करून देण्यामध्ये भारत अग्रगण्य आहे याचा भारतीय म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे असे सांगितले. ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी महिलांनी आणि युवकांनी गटशेती बरोबर गट पशुसंवर्धन करत त्या वरील उपयुक्त लघुउद्योग निर्मिती करावी. भविष्यात लोकल टु ग्लोबल हा विचार गावोगावी निर्माण करत ट्रेडिंग पर्यायाचा वापर करून गाव स्तरावरील उत्पादनासाठी योग्य मार्केटिंग करावी लागणार आहे तरच आपल्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळेल असे मत थायलंड सरकार वाणिज्य सल्लागार डॉ.चेतन नरके यांनी व्यक्त केले.

   परिसंवादाची प्रस्तावना आणि स्वागत मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांनी केले. ग्राम विकासामध्ये ग्रामीण भागातील शेती उद्योगांमध्ये महिलांचा 80% सहभाग असतो. शेतीचा दर्जा सुधारणे, शेती प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय  बँकांकडून वित्तीय सहाय्य करणे, महिलांचे क्लस्टर आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देणे यासारखे कार्य मानिनी फाउंडेशन ग्रामीण भागात करत असून त्याद्वारे ग्रामविकासामध्ये हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले.

        सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सरपंच परिषदेची कार्य आणि भूमिका मांडली. सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीतून आपापल्या गावांमध्ये कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिषदेच्या कार्यकारणी सदस्या सुरेखा दुबल यांनी केले. नाम फाउंडेशनचे मुख्याधिकारी गणेश थोरात आणि दीपस्तंभचे अमेय जोशी, परिषदेचे मार्गदर्शक शंकर बापू खोपे, परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष जिनत सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी उर्मिला मोरे, डॉ. संजय राठोड, संदीप थिटे यांचे विशेष सहकार्य लाभले. संयोजनासाठी कल्याणी कोतूरकर, सुजाता उरपे, भारती पाटील, कुमारी त्रिशिता चव्हाण, रवी बलांडे, गिरीश महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

इतर बातम्या