Lonavala News : राज्यातील महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी - प्रकाश जावडेकर

लोणावळा : महाराष्ट्र राज्यामधील महाविकास आघाडी ही अनैसर्गिक व एकमेकात गुंतलेली आघाडी असल्याची टिका भाजपाचे माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोणावळ्यात केली. भाजपा मावळ लोकसभा बुथ सक्षमीकरण कार्यक्रमासाठी ते लोणावळ्यात आले होते. यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले महाराष्ट्र विधानसभा शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून लढली व निवडून आल्यानंतर मोदी विरोधकांसह हात मिळवणी केली. या महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा फक्त कलेक्शन करणे व त्यांच्यावर असलेल्या केसेस संपवणे हा असल्याचे सांगितले. जावडेकर म्हणाले, मोदी सरकारने देशातील गरिबांचे सशक्तीकरण करताना त्यांना आत्मसन्मान दिला तसेच घरे, स्वच्छतागृह, विज, पाणी, गॅस, विमा, जनरल खातं, आयुष्यमान व सन्मान निधी या 10 गोष्टी दिल्या. राजीव गांधी म्हणायचे मी 100 रुपये दिले की गरिबांपर्यत 50 रुपयेच पोहचतात. आता मात्र मोदींनी दिलेले 100 पैकी 100 रुपये गरिबांपर्यत पोहचत आहे. मागील तीन वर्षात विविध योजनांचे सुमारे 21 लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यात जमा झाले असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. बुथ सशक्तीकरणावर बोलताना जावडेकर म्हणाले, हा भाजप पक्षाचा पुर्वीपासूनचा कार्यक्रम आहे. ज्याठिकाणी भाजपाला मते कमी मिळाली, त्याठिकाणी जाऊन बुथ सक्षमीकरणाचे नियोजन केले जाते. जेथे भाजपाचा खासदार नाही तेथे राज्यसभेचे खासदार पाठवून नियोजन केले जात आहे. माझ्याकडे पक्षाने मावळ लोकसभा मतदार संघ दिला आहे. येणार्या काळात बुथ सक्षमीकरणावर भर देण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर माईताई ढोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, लोणावळा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी सभापती देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, शंकरशेठ जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे आदी उपस्थित होते.