Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरामध्ये मंगळवारी 66 मिलिमीटर पावसाची नोंद; जोरदार पावसाने सर्वत्र दाणादाण

लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळा सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मंगळवारी मात्र जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरामध्ये पावसाने हजेरी लावली थोडा वेळ पाऊस पडल्यानंतर काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल ६६ मिलिमीटर पाऊस (2.60 इंच) एवढा पाऊस लोणावळ्यात झाल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरामध्ये रस्ते व गटारींची कामे सुरू आहेत. ती कामी अद्याप पूर्ण न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होऊन नागरिकांना वाहतुकीच्या समस्येचा देखील सामना करावा लागला. अवकाळी पावसाचे रूपांतर मान्सून मध्ये झाल्यास पुढील चार महिने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. याकरिता प्रशासनाने तात्काळ ही सर्व कामे पूर्ण करावीत तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी कामे महत्त्वाचे आहेत ती करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याची कामे आत्ताच मार्गी लावावी जेणेकरून पावसाळ्यात पाणी साचून मोठे खड्डे निर्माण होणार नाही याची देखील दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या