Breaking news

खोपोली पोलिसांनी रात्रगस्त दरम्यान आवळल्या अपहरणकर्त्या टोळीच्या मुसक्या; मुळशी तालुक्यातून केले होते तरुणाचे अपहरण

खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा येथे रात्रीच्या गस्तीच्यावेळी पोलिसांना संशयास्पद एक कार आढळली. कार थांबवून सखोल चौकशी केली असता, त्या कार मध्ये असलेल्या 5 जणांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून दिगंबर इंदलसिंग चितोडिया या तरूणाचे अपहरण केले असल्याचे उघडकीस आल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी अपहरणकर्त्यां टोळीच्या मुसक्या आवळून अपहरण झालेल्या तरूणाची सुटका केली. सदर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी खोपोली पोलिसांचे कौतुक केले आहे.

     खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा येथे  30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत असताना MH-04-CT-2597 या क्रमांकाची अल्टो कार त्यांना संशयास्पदरित्या जाताना दिसली. कारच्या मागील नंबर प्लेटवर हेतुपुस्सर चिखल लावला असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांचा संशय बळावला, त्यांनी कार आडवली व दाटीवाटीने बसलेल्या सहा इसमांची चौकशी केली सुरुवातीला ते ताकास तूर लावू देत नव्हते, मात्र त्यातील एकाने  'मला वाचवा' अशी विनंती केली. त्याची विनंती ऐकता क्षणी पोलीस सतर्क झाले आणि त्या सर्वांना खोपोली पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली.  चौकशी दरम्यान समजले की, कार मधील पाच जण अर्थात वामन मारुती शिंदे (39), योगेंद्र प्रसाद (25), दिलीप पासवान (32), धुरपचंद्र यादव (33), संदीप सोनावणे (35) हे सर्व राहणार अंबरनाथ, यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दिगंबर इंदलसिंग चितोडिया या सहाव्या इसमाचे अपहरण करून त्यास दोन दिवस अंबरनाथ येथे डांबून ठेवले होते असे समजले. दिगंबर इंदलसिंग चितोडिया यांच्या कुटंबीयांकडून  हे पाचजण 25 लाख रुपयांची मागणी करत होते.

    एवढ्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र. क्र.738/2021, भा.द.वी.कलम 364(अ), 386 या प्रमाणे अपहरण व खंडणी मागणे असा गुन्ह्या नोंद आहे असे समजले. हिंजवडी पोलीस ठाणे येथील      पोलिसांनी तातडीने खोपोली पोलीस ठाण्यात येऊन सदर आरोपींचा ताबा घेतला. अपहरण झालेल्या तरुणाला सुखरूप कुटुंबियांच्या हवाली केले आहे.

   अपहरण झालेल्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ, स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून त्यांचा यथायोग्य सन्मान देणार असल्याचे सुतोवाच आज तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले.

इतर बातम्या