अलंकापुरीत डीजेला फाटा देत गणेश भक्तांची पारंपरिक वाद्यांना पसंती; गणपती बाप्पांच्या विसर्जनाची दैदिप्यमान मिरवणूक
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : अलंकापुरी आळंदी येथे पंचक्रोशीत गणेश विसर्जन मिरवणूक उत्साह, आनंद व भावपूर्ण वातावरणात पार पडली. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया अशी साद गणेश भक्त लाडक्या बाप्पाला घालत होते. श्री गणेशाचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करीत आळंदी परिसरात कृत्रिम हौद्यात श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी इंद्रायणी नदी घाटा लगत असलेल्या गणेश विसर्जन कुंड परिसरात तसेच आळंदी रस्त्यावर गणेश भक्ती मंगलमय वातावरण होते. आळंदी पंचक्रोशीत उत्साहात, पारंपरिक वाद्यांच्या त्रिनादासह, भंडारा, पुष्प उधळीत हरिनाम गजरात विसर्जन मिरवणुका झाल्या. विविध मंडळांनी समाज प्रबोधन करीत चित्र रथातून श्रींचे मूर्तीची मिरवणूक काढत जल्लोषात रंग भरला. रात्री उशिरा पर्यंत मिरवणूक सुरु राहिली.
विद्युत रोषणाई ने सजलेले रथ भाविकांचे लक्ष वेधत होते. वारकरी वेशात शालेय मुलांनी हरिनाम गजरात श्रींचे विसर्जन केले. आळंदी, दिघी पोलिस स्टेशनचे हद्दीत उत्साही शांततेत तसेच पोलिस बंदोबस्तात भक्तिमय वातावरणात श्रींचे आनंदोत्सव सोहळ्याची सांगता उत्साहात झाली. शांतता सुव्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्त आणि उत्सव काळात सुरक्षित सुरळीत वाहतूक व्यवस्था करण्यात आली. यासाठी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, दिघी पोलिस स्टेशनचे बापूसाहेब ढेरे, पोलिस मित्र वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव, वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर यांचेसह पोलिस प्रशासनाने काम पाहिले. आळंदीतील सार्वजनिक स्वच्छता, गणेश विसर्जन कुंड, नागरी सेवा सुविधा या साठी आळंदी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह नगरपरिषद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गणेशोत्सव दरम्यान भाविक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षिका डॉ. उर्मिला शिंदे, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी परिसरात काम पाहिले. आरोग्य सेवेत नागरिकांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्ककर, यांनी परिश्रम पूर्वक आरोग्य सेवा रुजू केली. पोलीस मित्र सेवा यावर्षी रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, बाबासाहेब भंडारे आदी पोलीस मित्रानी रुजू केली. लक्षवेधी घरगुती गणेशोत्सवात अमित कुऱ्हाडे, अप्पा ढोले, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे यांचे घरातील लक्षवेधी गौरी गणपती सजावट पाहण्यास गणेश भक्त आणि महिला भाविकांनी गर्दी केली. यावर्षी राजे ग्रॉऊंपचे वतीने समाज प्रबोधन करणारा गड किल्ले संवर्धन हा देखावा लक्षवेधी ठरला. नागरिक, भाविकांनी येथे दर्शनास तसेच देखावा पाहण्यास गर्दी केली. राजे ग्रुप चे वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुरातन हेमाडपंथी श्री गणेश मंदिरात गणेशोत्सव अंतर्गत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने श्री अनंत पूजन प्रथा परंपरांचे पालन करीत झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेन्द्र उमाप यांचे हस्ते वेदमंत्र जय घोषात अनंत पूजन झाले. या प्रसंगी मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरू, सेवक राजाभाऊ चोपदार उपस्थित होते. श्रींचे पुजारी वेदमूर्ती विजय कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी यांनी परंपरांचे पालन करीत पौरोहित्य केले. आळंदी देवस्थान तर्फे प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिरात श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यात कीर्तन, प्रवचन, गावकरी भजन आदी कार्यक्रम झाले.
आळंदीत गणेश मूर्ती दान उपक्रमास गणेश भक्तांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. आळंदी नगरपरिषदेने मूर्ती दान संकलन केंद्र मध्ये मूर्ती स्वीकारल्या तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबविल्याने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. आळंदीत राजेश सुतार यांनी हजेरी मारुती मंदिर चौकात लक्षवेधी रांगोळी काढत मिरवणुकीत दाद मिळवली. नेहमी आळंदीतील गर्दीने फुललेला इंद्रायणी नदी घाट गणेश विसर्जन दिनी मात्र निर्मनुष्य राहिला. आळंदी नगरपरिषदेने श्रींचे मूर्ती दान स्वीकारण्याचे नियोजन केले होते. थेट इंद्रायणी नदीत मूर्ती विसर्जन करण्यास यावर्षी हि बंदी करण्यात आली होती. यासाठी उपाय योजनेचा भाग म्हणून प्रशासनाने इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजणे अंतर्गत उपाय करीत दोन्हा बाजूने संरक्षक पत्रे लावून घाटावर जाण्यास मर्यादा आणल्या. यामुळे भाविकांना थेट नदी घाटावर जाण्यास मर्यादा आली. नगरपरिषदेने शहरात विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारीत मूर्ती दान स्वीकारले. यासाठी सेवाभावी संस्थानचे कार्यकर्ते, एमआयटीचे विद्यार्थी, पोलीस प्रशासन, नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी, पोलीस मित्र स्थानिक नागरिक यांनी ही या उपक्रमाचे स्वागत करीत नदी प्रदूषण रोखण्यास सहकार्य केले. नगरपरिषदे तर्फे हजारो मूर्ती दान स्वीकारण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. यास भाविक, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. नगरपरिषदेने मूर्ती दान तसेच निर्माल्यादि वस्तू स्वीकारून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यास नागरिकांना देखील प्रोत्साहन दिले.
विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘त्रिशूल रथ’ प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाला या त्रिशूल रथावर बसवून मोठ्या मिरवणुकीतून विसर्जनास आणले. मिरवणुकीत ‘श्री अरंबा पथक’ यांचे भव्य सादरीकरण झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात मिरवणूक झाली. आळंदीतील अखिल भाजी मंडई मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, व्यापारी तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ, मल्हार मित्र मंडळ, धर्मराज मित्र मंडळ, जय गणेश मंडळ, जय गणेश प्रतिष्ठान, शिवस्मृती प्रतिष्ठान, दत्तनगर मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, पद्मावती माता मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, वृंदावन कॉलनी मित्र मंडळ आदी मंडळांनी गणेशोत्सवात भाग घेऊन शांततेत उत्सव साजरा केला.
आळंदीतील विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये पद्मावती माता मित्र मंडळाने हरिनाम गजरात बैल जोडत विद्युत रोषणाईने सजलेला रथ मिरवणूक काढली. जय गणेश ग्रुप मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र सजीव देखावा सादर केला. गजरथ मिरवणुकीत आणून विद्युत रोषणाई ने भाविकांचे लक्ष वेधले. जय गणेश प्रतिष्ठाण तर्फे समाज प्रबोधन करण्यात आले. गुन्हेगारीस आळा, लोकशाहीस लळा हा देखावा सादर करीत दाद घेतली. शिवतेज मित्र मंडळाने महाकाल की सवारी हा देखावा मिरवणुकीत दाद मिळवून गेला. कुऱ्हाडे आळी तील धर्मराज ग्रुप ने महाकाल देखावा सादर करून भाविक, नागरिकांचे लक्ष वेधले. सुवर्णयुग प्रतिष्ठान, व्यापारी तरुण मंडळाने शिवशंकररथ सादर करत मिरवणुकीत रंग भरला. एकत्व मित्र मंडळाने दुर्गारथ, दत्त नगर मित्र मंडळाने रामरथ देखावा ढोल ताश्यांचे गजरात विसर्जन मिरवणूक काढली. शिवस्मृती प्रतिष्ठान तर्फ लालबाग राजा गणेश मूर्ती मिरवणुकीत आणून ढोल ताशांचे गजरात श्रींची मिरवणूक आणली. चाकण चौकातील अमरदीप तरुण मंडळाने श्रींच्या मूर्तीचे गणेश भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. मिरवणुकी दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी, भंडारा उधळण, रांगोळीचे पायघड्या पुष्प उधळण, रंगीबेरंगी कागदी लक्षवेधी तुकडे उधळत गुलालाला राम राम केला. आळंदी, दिघी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मिरवणूक उत्साही जलोषाचे वातावरणात शांततेत झाली. नगरपालिका, पोलीस प्रशासनाचे नागरिकांनी यामुळे कौतुक केले. आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने दोन विसर्जन कुंड ठेवण्यात आले. या उपक्रमास भाविकांनी प्रतिसाद देत कुंडात श्रींचे विसर्जनास प्रतिसाद दिला. यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस मित्र रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, बाबासाहेब भंडारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, दिघी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू साहेब ढेरे, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, अधिकारी, पोलीस मित्र वैभव दहिफळे, मयूर गिल, कर्मचारी यांचे बंदोबस्तात, उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.