Breaking news

महिलांसाठी महत्वाची बातमी : अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी ‘सखी-एक थांबा केंद्रा’शी संपर्क साधण्याचे आवाहन

मावळ माझा न्युज : कौटुंबिक छळ, बलात्कार, लैंगिक छळ, देहविक्री, अँसिड हल्ला, बालविवाह, सायबर गुन्हा, अपहरण व इतर प्रकरणांमधील अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळविण्याकरीता सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

      सखी एक थांबा केंद्रामार्फत एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत विविध प्रकारची मदत अत्याचारपिडीत महिला व बालिकांना देण्यात आली आहे. यामध्ये 225 महिला व बालिकांना विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सहाय्य व सल्ला, 70 जणींना वैद्यकीय उपचारासाठी मदत व मार्गदर्शन, पोलीस कारवाईसाठी मदत व मार्गदर्शन 87 जणींना, 446 जणींना मानसिक समुपदेशन, 152 महिला व 18 बालिकांना सखी - एक थांबा केंद्र येथे तात्पुरता आश्रय पुरविला असून 83 महिला व बालिकांना इतर सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.

     सखी-एक थांबा केंद्र क्र. 1, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, मुंढवा, पुणे- 36 येथील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, विशेषगृह, बालगृह, (संपर्क क्रमांक - 8177955181) येथे स्थापन करण्यात आले आहे. तरी अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी मदतीसाठी सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले आहे.

इतर बातम्या