Breaking news

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

लोणावळा : राज्यात अतिवृष्टीने  मराठवाडा विदर्भ या भागात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. तसेच दलित अत्याचार रोखण्यासाठी ऍट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलाबाजवणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखवेत, अत्याचार पीडित महिलांना राज्य सरकार ने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे या मागणीसाठी येत्या दि. 20 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर आंदोलन करणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केली. 

   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी लोणावळ्यात पार पडली. बैठकीत विविध ठराव मंजूर झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती करावी आणि भाजप ने रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक महापालिकेत जागा सोडाव्यात असा ठराव रिपाइं च्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर झाला. एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकार ने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे. एक व्यक्ती एक मत एक मूल्य या संकल्पनेला छेद देणारी पद्धत आहे, त्यामुळे एक प्रभाग तीन सदस्य या पद्धतीला रिपब्लिकन पक्ष तीव्र विरोध करीत असून वेळ पडल्यास न्यायालयात जाऊन एक प्रभाग तीन सदस्य पद्धतीला विरोध करू अशी भुमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

    राज्यात आगामी विधानसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढल्या पाहिजेत. त्यासाठी राज्यात विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यानी तयार करावेत. मनपा निवडणूकीत भाजप सोबत युती करून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यानी आपले मतदारसंघ मजबूत बांधावेत. बुथ प्रमुख बनवावेत. निवडणुकी जिंकण्यासाठी पक्ष राजकीय पक्ष म्हणून बांधणी करावी. राज्यात 50 लाख सदस्य नोंदणी करावी असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. 

    या बैठकीला राष्ट्रीय सचिव माजी मंत्री अविनाश महातेकर, प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश सचिव राजा सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल भादुरे यांच्यासह सर्व  जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच नियोजन पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के यांनी केले होते.

इतर बातम्या