नेसावे जिल्हा परिषद शाळेस सुमारे दोन लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याची भेट
नेसावे (मावळ) : नेसावे जिल्हा परिषद शाळेत मुंबई येथील उद्योजक व समाजसेवक श्री. रवींद्र पाटोदिया, सौ. आशा पाटोदिया, श्री. परीक्षित पाटोदिया, श्री. अरुण सेखसारिया, सौ. कल्पना सेखसारिया, सौ. सरिता गोयंका, श्री. हेमंत कांबळे तसेच सौ. माधुरी हेंड्रिक्स यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वॉटर बॉटल, वह्या, छत्र्या, ड्रॉईंग किट, विविध खेळणी व खेळाचे साहित्य यांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेसाठी पाच टेबल-खुर्च्या, इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. याशिवाय भविष्यातही शाळेला आवश्यक असणारे आणखी साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. या माध्यमातून शाळेला सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य प्राप्त झाले.
या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ नामदेव शिरसट यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री. रवींद्र पाटोदिया यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. त्र्यंबक आहेर सर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. प्राजक्ता जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ नामदेव शिरसट यांनी केले.
यावेळी आपल्या मनोगतात अध्यक्ष श्री. नवनाथ शिरसट म्हणाले की, "शिक्षण क्षेत्रात केलेली मदत ही समाजासाठी सर्वात मोठी गुंतवणूक असते. कारण एका विद्यार्थ्याला मिळालेली संधी त्याचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि पुढील पिढीचे भविष्य घडवते." त्यांनी मान्यवरांनी केलेल्या योगदानाचे कौतुक करत शाळेच्या विकासासाठी अशाच प्रकारे सहकार्य मिळत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गोडी वाढण्यास मदत होणार आहे. ड्रॉईंग किटमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला चालना मिळेल. शिष्यवृत्ती पुस्तके विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार होण्यास उपयुक्त ठरतील. तर खेळणी व क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे. खेळातून संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि शिस्त यांसारखे महत्त्वाचे गुण विकसित होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, महिला, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक व क्रीडा साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. रवींद्र पाटोदिया यांनी भविष्यातही शाळेला आवश्यक असणारी मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असे आश्वासन दिले. कार्यक्रमानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यांच्या या उदात्त कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार असून नेसावे जिल्हा परिषद शाळेच्या विकासात हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.






















