शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना १ हजार दप्तरांचे वाटप; वृक्षारोपणासह उपक्रम उत्साहात संपन्न
लोणावळा : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील आदिवासी व अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने भरलेल्या दर्जेदार दप्तरांचे वाटप करण्यात आले. वह्या, गोष्टींची पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याने सज्ज अशा एक हजार दप्तरांचे वितरण करण्यात येत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
या उपक्रमासाठी गेल्या दीड महिन्यांपासून संस्थेचे कार्यकर्ते नियोजनबद्ध तयारी करत होते. दप्तरांसाठी निधी संकलन, शैक्षणिक साहित्य खरेदी, दप्तरांची तयारी तसेच वितरणाचे नियोजन यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करून करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मावळ तालुक्यातील सुमारे ५० दुर्गम भागातील शाळांकडून विद्यार्थ्यांना दप्तरे उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. दप्तर वाटप आणि वृक्षारोपण हे दोन्ही उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी संस्थेच्या भविष्यातील विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘आम्ही पालक’ या उपक्रमाची उद्दिष्टे आणि त्यामागील संकल्पनाही उपस्थितांसमोर मांडली.
संस्थेच्या कार्यकर्त्या शुभा मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून "चलो कुछ अच्छा करें" हा संदेश देत समाजहिताच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. समाजातील अधिकाधिक लोकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेषतः आशुतोष जोशी, नीलाक्षी जोशी, आशुतोष आठल्ये, रितेश गुप्ता, भगवान गायकवाड तसेच संस्थेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांचे उल्लेखनीय योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामीण भागातील शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिवसेवा प्रतिष्ठानचे आभार मानत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.






















