Breaking news

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तुंगार्ली धरण परिसरात ९५ झाडांची लागवड; संवर्धनाचाही संकल्प

लोणावळा : परमपूज्य डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अठराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरातील तुंगार्ली धरण परिसरात १९ जुलै रोजी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरात ९५ झाडे लावण्यात आली असून, केवळ वृक्ष लागवड न करता ती झाडे पूर्णपणे जगविण्याचा व त्यांच्या संवर्धनाचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. करंज, कांचन, पिंपळ, शिसम, भेहडा, जांभूळ, पळस, ताम्हण, कडू लिंब, मोहगनी, रेन ट्री या झाडांचा यामध्ये समावेश आहे.

९० श्री सदस्यांचा सक्रिय सहभाग

'ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो' या उदात्त हेतूने आणि प्रतिष्ठानच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे हे समाजोपयोगी उपक्रम राबवून गुरु माऊलींना आदरांजली वाहिली जाते. या भावनेतून आयोजित केलेल्या या वृक्षारोपण मोहिमेत तुंगार्ली, डोंगरगाव, देवले, तळेगाव, कार्ला आणि आंबवणे या विविध बैठकींमधील ९० श्री सदस्य अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.

निसर्गसंपदा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य

लोणावळा शहर हे जागतिक स्तरावर पर्यटनाचे एक निसर्गरम्य स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच निसर्गसंपदा टिकवून ठेवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली.  

महत्त्वाची बाब म्हणजे, प्रतिष्ठान केवळ वृक्ष लागवड करत नाही, तर ती झाडे मोठी होईपर्यंत ती जगविण्याची संपूर्ण जबाबदारी देखील घेते. यापूर्वीही प्रतिष्ठानच्या वतीने या भागात वृक्ष लागवड करण्यात आली होती आणि योग्य देखभालीमुळे ती झाडे आज या परिसरात दिमाखात उभी आहेत.  

      हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केवळ एक दिवसाचा सोहळा न ठरता, लावलेली सर्व ९५ झाडे व्यवस्थित जगली पाहिजेत यासाठी प्रतिष्ठानने विशेष नियोजन केले आहे. या झाडांना नियमित पाणी घालणे, त्यांचे प्राण्यांपासून रक्षण करणे आणि वेळोवेळी योग्य खतपाणी देणे, ही सर्व जबाबदारी स्थानिक श्री सदस्यांनी सामूहिकपणे आपल्या खांद्यावर स्वीकारली आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. प्रतिष्ठानच्या या नव्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आणि श्री सदस्यांच्या निस्वार्थी भावनेचे स्थानिक ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे.  

इतर बातम्या