Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरात पावसाचा जोर पुन्हा वाढला; शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे राष्ट्रीय मार्गावर वाहतूक कोंडी

लोणावळा : मागील आठवडाभरापासून उघडीप घेतलेले पावसाचा जोर लोणावळा शहरात पुन्हा वाढला आहे. शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळच्या सत्रात ढगांच्या गडगडाटासह लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला. त्यातच शनिवार व रविवार ची सुट्टी असल्यामुळे लोणावळा शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांच्या या वाहनांमुळे लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पवनानगराकडे जाणाऱ्या मार्गावर देखील दुधीवरे खिंड परिसरात मोठी कोंडी झाली होती. भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

     जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच, सहा व सात जुलै रोजी लोणावळा शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने समाधानकारक उघडीप घेतली. 15 जुलै पासून शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन दिवस कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसाचा जोर शनिवारी पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सखल भागातील अनेक रस्त्यावर पुन्हा पाणी साचलेले पहायला मिळाले. पावसाचा जोर वाढल्यास प्रशासनाने व लोणावळा नगरपरिषदेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सुट्यांचा आनंद व पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी

लोणावळा शहरात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आजचा पाऊस पर्वणी ठरला. सहारा पुलासमोरील दोन्ही धबधबे आज भरभरून वाहत होते. त्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. लायन्स पॉईंट, तुंगार्ली धरण या भागात देखील पर्यटकांची गर्दी झाली होती. खंडाळा परिसरात पावसाच्या सोबत धुके देखील असल्याने निसर्गाच्या या रूपाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी घेतला. मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी मागील आठवड्यात लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर लागू केलेले प्रतिबंधात्मक आदेश मागे घेतल्याने पर्यटक व स्थानिक व्यासायिक आनंदित होते.

इतर बातम्या