Breaking news

सरसकट फेरीवाल्यांना गुन्हेगार ठरवू नका - कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे

पिंपरी : चाकू व सुरा चालविणारे फेरीवाले नाहीत. तरीही पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी सर्व पथारी, हातगाडी धारक गुन्हेगार आहेत, असे गृहीत धरून अतिक्रमण पथकाला सुरक्षा देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात अशी एकही घटना न घडता दिलेला आदेश हा फेरीवाल्यांचा अपमान करणारा आहे. टपरी, पथारी, हातगाडी धारक फेरीवाले यांना सरसकट गुन्हेगार गृहीत धरून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शहरात कारवाई सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 20 लाखांपेक्षा अधिक फेरीवाले आहेत. अनेक वर्षापासून नागरिकांना सेवा देण्याबरोबरच स्वतःच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह करून रोजगार निर्मिती देखील ते करत आहेत. या फेरीवाल्यांना ठाणे येथिल एका घटनेवरून गुन्हेगार ठरवून दुजाभावाची वागणूक दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकरी नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.

    निगडी लोकमान्य टिळक चौक या ठिकाणी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने  आयोजित  बैठकीत बाबा कांबळे बोलत होते. यावेळी बसवराज नाटेकर, संतोष यादव, काळूराम कांबळे, सुनील गायकवाड, सचिन म्हेत्रे, दत्ता लोखंडे, बाबू कुरेशी, धनराज चव्हाण, सनी गायकवाड, सुरेश शिंदे, अंकुश गुंजाळ, बाळासाहेब राम गायकवाड, बंडू डोंगरे, महेश उदगे आदी उपस्थित होते. 

    बाबा कांबळे म्हणाले की, फेरीवाल्यांशी संबंध ठेवायचे नाही, असे फर्मान ठाणे मनपा आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी काढले आहे. फेरीवाल्यांशी संबंध ठेवले म्हणून शर्मा यांनी पथकातील एका कर्मचाऱ्याचे निलंबन केले. अधिकारी वर्गातून फेरीवाल्यांना मारण्याची व उद्ध्वस्त करण्याची भाषा केली जात आहे. एका फेरीवाल्याच्या चुकीमुळे सर्वांनाच चुकीची वागणुक दिली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला. कांबळे म्हणाले, हल्ला करणे ही आमची संस्कृती नाही. कोविड-19 मुळे फेरीवाल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. बँक आणि सावकारांचे कर्ज थकले आहे. 14 महिने व्यवसाय बंद असल्यामुळे फेरीवाले आर्थिक संकटात सापडलेले आहेत. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेते, स्थानिक नगरसेवक, मनपा अधिकारी यांचे नातेवाईक यांचे अनेक भागात भाड्याने स्टॉल आहेत. मनपा अधिकारी, स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुंड यांचे आर्थिक हितसंबंध उघड आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी गोरगरीब फेरीवाल्यांना त्रास दिला जात आहे. ठाणे येथे अधिकाऱ्यांवर  झालेल्या हल्लाचा आम्ही निषेध करतो. परंतु या प्रकरणी सर्वच फेरीवाल्यांना गुन्हेगार ठरवले आहे, ते योग्य नाही. फेरीवाल्यांसाठी झालेल्या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महानगरपालिका 2007 व्यवसायाचे विनियमन आदेश उपविधी 2009 महाराष्ट्राच्या फेरीवाला कायदा केंद्र सरकार कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय फेरीवाल्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.

इतर बातम्या